कृष्णकिनारा

निमित्त....

कृष्णकिनारा


आज अरूणा ढेरे यांच्या कृष्णकिनारा कथासंग्रहातील राधा या कथेचे अभिवाचन ऐकण्याची पर्वणी मिळाली. कथा वाचणं आणि ऐकणं यात नक्कीच श्रवणीयतेचा अनुभव मनाच्या अधिक जवळ नेणारा आहे. राधा आणि कृष्णाची सागरकिनारी होणारी भेट व त्यांच्या संवादातून आयुष्यातील काही भावबंधाच्या गाठी अलगद सोडणारे शब्द. राधेचे कृष्णार्पण आजही अपुऱ्या प्रेमासाठीच उदाहरण म्हणून दिलं जातं. तिच्या ओंजळीत प्रेमाच्या काही क्षणांची पुरचुंडी देऊन कृष्ण निघून गेला...तेच मोहोळ तिने जपलं. कित्येक वर्षांनी पुन्हा भेटीचा क्षण आला तेव्हा राधेने कृष्णप्रीतीच्या आठवांची ती पुरचुंडी उघडली खरी...पण कृष्णाने तिच्या प्रत्येक हळव्या प्रश्नाला कठोर उत्तराची झालर लावली. प्रेम जहरी असतं...कडू असतं खूप...न मिळालेलं प्रेम तर खूपच वेदनादायी...राधेने ते तिच्यात भिनवलं. माझं तुझ्या अपुरेपणाशीच नातं होतं असं म्हणणाऱ्या राधेला जेव्हा कृष्ण म्हणतो की प्रत्येकाचं स्वतंत्र जगणं अटळ आहे, तेव्हा तिने त्याच्या वाटेकडे लावलेल्या डोळ्यात टचकन पाणी येतं. तिच्यासाठी तो समुद्र व्हावा असं तिला वाटत असतं...लाटेसारखा येऊन प्रवाहाच्या मिठीत नेणारा...पण कृष्ण म्हणतो...जसं, समुद्राला खारटच रहावं लागतं...गोड होता येत नाही...कितीही व्हायचं ठरवलं तरीही...
माणसाचं आयुष्यही कधी कधी समुद्रासारखं होऊन जातं का...राधेसारखी गोड माणसं आयुष्यात हवी असूनही काही कारणांनी समुद्राचा खारटपणा घेऊन तिच्यापासून लांब जाणारं...?

Comments

Popular posts from this blog

सिंक...मी आणि मावशी

क्यू की बोलना जरुरी है बॉस...