वाचूया...तू मला अन मी तुला

वाचूया...तू मला अन मी तुला

'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे...' सहा शब्दांच्या या ओळीतील हा दोन व्यक्तींमधला संवाद. काय लागतं एकमेकांशी बोलायला? शब्दांच्या राशी...?अलंकारीक उपमांचे मनोरे...? व्याकरणाचे नियम ओवून गुंफलेली विशेषणांची माळ?... बरं, हा सगळा प्रपंच मांडूनही कधी कधी नाहीच पोहचत इकडून तिकडे भावनांची वाट....मग तेव्हा खात्री पटते की कितीही मोहक, प्रभावी, परिणामकारक असलेल्या शब्दांशिवाय...अहं...भाषेशिवाय बोलता येतं की...बोलता येतं तसं ऐकता येतं...वाचता येतं...जाणता येतं...समजून घेता येतं...फक्त त्यासाठी डोळ्यांची भाषा यायला हवी. संवेदनशीलतेचे व्याकरण उमगायला हवे...कणव म्हणजे काय याचे उत्तर माहित असायला हवे. ठेच लागताच कसं...'आई गं !असं आपसूक ओठावर येतं...भीती वाटली की कसं 'बाप रे! हेच शब्द येतात...छान फूल पाहिलं की 'अहाहा'' या शब्दाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही...दु:खद बातमी ऐकली की कसं 'अरेरेरे' म्हणून टचकन पापणी पाणवते...अनेकदा यातील शब्दांपेक्षा त्यातील भाव जगतो आपण. आजूबाजूच्या अनेक गोष्टी, घटना, इतकच काय तर माणसंही डोळ्यांनी अनुभवत असतो, वाचत असतो. मनाच्या भाषेला तर शब्दांची गरजच नसते. कित्येक दिवस उन्हाने तापलेल्या मातीवर पडणारा पाण्याचा एकादा थेंब तिच्यात एका क्षणात झिरपून जावा तशी एकादी व्यक्ती आपल्यात झिरपते. तिथे भाषेचे सौंदर्य, शब्दांचे अलंकार, स्तुतीची सुमने, कौतुकाचे वर्षाव यापलीकडे माणूस वाचता येतं. जाणून घेता येतं. पुस्तकांची पानं पलटावी आणि कथानक पुढे सरकावं तसंही काहीसं माणूस वाचताना होतं. काय वाचतोस सध्या? या प्रश्नावर कधीतरी... मी ना, माणसं वाचतो असं उत्तर देऊन पहावं आणि त्याच क्षणी हा प्रश्न विचारणाऱ्याच्या चेहऱ्यावरची रेष अन् रेष टिपावी...कमाल अनुभव असेल तो. कधी कधी मळलेल्या पायवाटेसारख्या ओळीही असतात. त्यातलीच ही एक ओळ. एक हजार शब्दांत जे सांगता येणार नाही ते एक छायाचित्र बोलतं. निर्विवाद मान्य. पण त्याही पुढे जाऊन असं म्हणायला हरकत नाही की लाखो करोडो शब्दांत जे व्यक्त होणार नाही ते डोळ्यांतून, , देहबोलीतून, हावभावातून, अगदी मौनातूनही समजून घेता येतं. माणूस वाचताना नेमकी हीच शब्दांपलीकडची भाषा यायला हवी. अवघड नसते ही भाषा. फक्त मनात भावनांचा कप्पा असला की बस्स... न बोलताही बोलता येणं यातून माणूस वाचण्याची अनुभुती येते. आपल्या रोजच्या सहवासातील व्यक्तीची एक ठराविक व्यक्त होण्याची पद्धत असते. तिचा एक अविर्भाव असतो वावरण्यातला. आपल्या बोलण्याला प्रतिसाद देण्याचा बाज, लहेजा असतो तिचा स्वत:चा. नेहमीची हसण्याची एक लकेर असते. तिच्या कपाळावरची नाराजी दाखवणारी ती आठीही आपल्या ओळखीची असते...हे त्या व्यक्तीचं 'असणं' असतं. तिच्या 'असण्या'तून आयुष्यातील ती व्यक्ती आपल्यात झिरपलेली असते. यापैकी एक जरी खूण चुकली तरी आपल्याला कळतं की काहीतरी बिनसलय. शब्दांशिवाय...भाषेशिवाय हे वाचणं एकाद्या भल्यामोठ्या कादंबरीची पानंच्या पानं वाचण्याइतकच किंबहुना  त्याहीपेक्षा गहिरं आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती असावी...पुस्तकांच्या पानात तल्लीन करते तशी एक माणूस वाचण्याची अबोल भाषा प्रत्येकाने शिकावी...
_______ मनातलं...ओठावर
@अनुराधा कदम

Comments

Popular posts from this blog

सिंक...मी आणि मावशी

कृष्णकिनारा

क्यू की बोलना जरुरी है बॉस...