सिंक...मी आणि मावशी
परवा घरातलं सिंक खराब झालं...आमच्याकडे कामात मदत करायला येणाऱ्या मावशी आणि मी दोघीच घरी होतो. सकाळचे साडेआठ वाजलेले. सिंकमधल्या पाण्याने जणू संप केल्यासारखे धरणे धरले होते. स्वयंपाकघरातली ही जागा म्हणजे सतत पाण्याखाली असलेली. प्लंबरला फोन लावला. पंधरा मिनिटात तो आला आणि म्हटला सिंकच्या पाइप बदलायला हव्यात. त्याला म्हटलं, जा आणि तुला काय लागेल ते सामान घेऊन बदलायच्या तयारीनंच ये...पुन्हा पंधराव्या मिनिटाला पठ्ठ्या हजर. आणि पुढच्या वीस मिनिटात नवं सिंक लागलं सुद्धा. साहित्यखर्च, मजुरीचे पैसे आणि गरमागरम चहा देऊन त्याला निरोप दिला. हे सगळं आमच्या कामाचा मावशी बघत होत्या.. गेल्या महिन्याभरात दमवलेल्या सिंकचा प्रॉब्लेम तासासव्वातासात मिटला. सिंक दुरूस्त झाल्याचा आनंद माझ्यापेक्षा मावशींच्या चेहऱ्यावरच उसळत होता. पण दुसऱ्याच क्षणी त्या मला म्हणाल्या, ताई, तुम्ही घरात कुणाला विचारलच नाहीत की सिंक दुरूस्तीला प्लंबरला बोलवू का? बोलवल्यानंतरही सिंकची पाइप बदलायला त्याला सांगू का? त्याने जे काही मजुरीचे पैसे सांगितलेत त्यावर व्यवहार ठरवू का?...मी म्हटलं, त्यात विचारण्यासारखं...किंबहुना घरातील इतरांची परवानगी घेऊन काही निर्णय घेण्यासारखं काय आहे? भिजत घोंगडं हवं कशाला...त्यावरच मावशींच्या उत्तराने मात्र मला एक वेगळीच बाजू दिसली. त्या म्हणाल्या, असा घरातला साधासा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला नाही ताई...स्वयंपाकघरातील निर्णय सुद्धा मी घेऊ शकत नाही...मला विचारलं का नाही...तुझं डोकं चालवायला कुणी सांगितलं होतं...इथंपर्यंत ठिक आहे. पण कुणी घरात नसताना प्लंबरला बोलवलंसच का? असा प्रश्न तोंडावर फेकला जाईल नवऱ्याकडून. मावशी बोलून गेल्या खरं...पण सिंक बदलण्याच्या निमित्ताने अजून किती बदल व्हायला हवाय समाजाच्या मनात या विचाराचा प्रवाह सुरू झाला. मावशींसारख्या माझ्या कितीतरी मैत्रिणी मनातलं कृतीत आणण्यासाठी धडपडत असतील ना..
@अनुराधा कदम, कोल्हापूर
Comments