Posts

Showing posts from January, 2017

प्रत्यक्ष बोल...

काल संक्रांत झाली. तिळगूळ घ्या आणि गोड बोला असं लिहिलेले खूप संदेश आले. सोबत तिळगूळ, तीळाची वडी...लाडू यांची संग्रहित छायाचित्रेही आली....पिढ्यानपिढ्या आपण ‘तिळगूळ घ्या...गोड बोला‘ म्हणत आलो आहोत. कालदेखील तीच री ओढली...वाईट काहीच नाही यामध्ये...पण मनात आलं की आजच्या घडीला या वाक्यात हलकासा बदल झाला पाहिजे...नव्हे बदल केला पाहिजे. ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ ऐवजी ‘तिळगूळ घ्या आणि प्रत्यक्ष बोला’ असे म्हणण्याचा बदल...आता तुम्ही म्हणाल की, बोलतोच आहोत की आपण... व्हॉटसअॅपवरच्या डीपीला किंवा फेसबुकवरच्या प्रोफाइल फोटोला नाही का आम्ही कमेंट देत...मस्त, नाइस, सुंदर, वॉव...इत्यादी इत्यादी. एखादा किस्सा शेअर केला तर त्यालाही अशीच एखादी प्रतिक्रिया दोनचार शब्दातली...पण ते तर चॅटिंग आहे ना...बोलणं नाही. बोलण्यातला प्रवाहीपणा त्यात नाही...हसत हसत एखादी टाळी देणं तिथे नाही...शब्दासोबत बोलणारे डोळ्यातले भाव वाचणं तर त्याहून नाही...शब्दातल्या चढउतारातून भावनांचे हिंदोळे तिथे नाहीत...एकमेकांना मध्येच थांबवून आपला मुद्दा पटवण्यातील संवाद नाही की मला काय म्हणायचे आहे ते समोरच्याला समजले

पत्रकारितेने मला काय दिले...?

पत्रकारितेने मला काय दिले...? कधी शब्दाला शस्त्र बनवून विघातक गोष्टींवर प्रहार करायचा तर कधी त्याच शब्दाचे मोरपीस बनवून समाजातील विधायकतेचे कौतुक करायचे हा पत्रकार म्हणून माझा धर्म. गेली १६ वर्ष मी तो मनापासून जपते आहे आणि जगते आहे. शब्दाच्या अनेक छटा हाताळत हा प्रवास नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. आजच्या पत्रकार दिनाच्या औचित्याने, पत्रकारितेने मला काय दिले? असा विचार करते तेव्हा खूप अभिमान वाटतो. माझ्या लेखणीने मला माणूस म्हणून घडवले. विचारांना धार दिली आणि निर्णयक्षमतेचा पाया दृढ केला. धैर्य, आत्मविश्वास आ​णि स्वाभिनानाची त्रिसूत्री माझ्या अंगी भिनवली.   रोज नवा दिवस नव्या अनुभवासोबत जगण्याची संधीही या पत्रकारितेनेच दिली. माणसं कमावून कधीही न संपणारी श्रीमंती मला दिली...माझ्या खारीच्या वाट्याने समाजाला घडवणारी माझ्या हातातील लेखणी मलाही घडतवेय आणि घडवत राहील...

लगेच पुढचा कार्यक्रम

साहित्य संमेलन...शास्त्रीय गाण्याची मैफल...एखादी प्रकट मुलाखत, सखोल विवेचनावर आधारित परिसंवाद...अशा कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून येणाऱ्या राजकीय नेत्यांना नेहमी लगेच पुढचा कार्यक्रम कसा काय असतो हे मला अजूनही कळलेले नाही. संयोजकांनी दोन महिने आधी नेत्यांची वेळ घेतली तरी प्रत्यक्ष कार्यक्रमादिवशी शुभेच्छांची साच्यातले भाषण करून लगेच माफी वगैरे मागून नेतेमंडळी निरोप घेतात. पण पक्षाचे प्रमुख, अध्यक्ष यांच्या सभा अगदी आयत्यावेळी ठरल्या तरी यांच्याकडे चारेक तासांचा वेळ अगदी सहज असतो. कोल्हापुरातील मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनादिवशी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर अश्विनी रामाणे, आमदार राजेश क्षीरसागर आणि समारोपादिवशी माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनाही असा लगेच पुढचा कार्यक्रम होता. एखाद्या परिसंवादासाठी तासभरही त्यांनी देऊ नये का?

टिकली....

माझी टिकली नेहमी मोहरीच्या आकाराची असते...परवा गौरीच्या हळदीकुंकू समारंभाला एका स्नेहीकाकूंनी बोलवलं. मी अगदी नेहमीसारखीच गेले... तिथे आलेल्या दुसऱ्या एक काकू म्हणाल्या...अगं, टिकली फारच लहान आहे गं तुझी...दिसतच नाही... मी रोज एवढीच लावते असं आपलं मी सांगितलं...तर त्यांचं उत्तर होतं की नेहमीचं वेगळं. आज हळदीकुंकवाला येताना ‘मोठ्ठी’ लावून यायचंस ना...मला अजून हे कोडं उलगडलेलं नाहीय की टिकलीचा आकार केवढा आहे यावर नेमकं काय अवलंबून आहे...? बर एरव्ही छोटी टिकली चालेल पण पारंपरिक कार्यक्रमात ती मोठ्ठी लावल्यामुळे काय फरक पडणार आहे...? टिकलीचा आकार हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे का?...

काकुबाई दिसत असून सुद्धा म्हणजे नेमके काय...

परवा एक पोस्ट आली फेसबुकवर...त्याची सुरूवातच अशी होती की...दिसायला काकुबाई दिसल्या तरी ही महिला एका चांगल्या पदावर कार्यरत आहे. ज्यांनी हे शब्द रचले त्यांचा दृष्टिकोन खटकला. मुळात कशीही गुंडाळलेली साडी...केसांचा अंबाडा किंवा मुरकुटं करून मानेच्यावर पिनमध्ये कोंबलेले केस...खोचलेला पदर अशा रूपातली महिला समोर आली की तिला अनेकदा काकुबाई हे विशेषण अगदी सहजपणे लावले जाते. फार कशाला कधी कधी आपल्याला काहीही न आवरता अजागळ रहावेसे वाटते तेव्हा जर तीच महिला अगं आज माझी पार काकूबाई झालीय अशी उपाधी स्वताच लावून घेते...सांगायचा मुद्दा हा की कुणी केली ही व्याख्या. आणि मग नेहमीच अशा रूपात असलेल्या महिलांमध्ये काही धमकच नसते असा अर्थ घ्यायचा का... दिसायला काकूबाई असूनसुद्धा या महिलेने खूप मोठ्या पदावर काम केलेय असा तुलनात्मक अर्थ काढणाऱ्यांनी महिलांच्या कार्यक्षमतेबाबत आणि त्याच्या दिसण्या व असण्याबाबत बोलूच नये.