माझं सावलीचं झाड
माझं सावलीचं झाड
माझं सावलीचं झाड होता तुम्ही....माझं लग्न ठरलं आणि तुम्ही
मला म्हणालात...कधी तू इतकी मोठी झाली मला कळलच नाही बाळा... त्यादिवशी माझ्यातील अवखळपणाला पहिला धक्का लागला....मी मोठी झाले असं वाटण्यासाठी माझं लग्न ठरणं हे कारण ठरावं आणि ते तुम्ही बोलून दाखवावं...हे काही केल्या स्वीकारायला मन तयारच होईना. लग्नाच्या दिवशीही संध्याकाळी सगळं आटपल्यावर तुम्ही माझ्या जवळ आलात आणि म्हणालात....झालं ना सगळं तुझ्या मनासारखं....तेव्हाही माझं मन इतकं जपण्यापलीकडे तुम्हाला काही माहितीच नसल्याची नेहमीचीच प्रचिती मला आली. त्यादिवशी तुमच्या मिठीत मनसोक्त रडताना....तुमचा हात सोडून जाताना...सारखे सारखे मागे वळून पाहताना...तुमच्यातील ठाम माणूसही किती हळवं आहे हे जाणवलं.
तुमच्या लेखी मी आता मोठी झाले होते असं असलं तरी मला मोठं व्हायचच नव्हतं. सरनाईकची कदम झाल्यानंतरही माझा तुमच्याजवळ हट्ट करण्याचा स्वभाव काही बदलला नाही. मला हे हवय...मला ते हवय, आत्ता द्या...गणपतीच्या सणात गौरीसाठी साडी आणायला गेल्यानंतर मला आवडलेली साडी हट्टाने मागून घेण्यात कुठेच खंड पडला नाही. इतकच नव्हे तर जरा डोकं दुखतय असं तुमच्यापाशी म्हटलं तरी तुम्ही कपडे चढवायचा अन् मला गोळी आणून द्यायचा. खरंतर मेडीकलमधून गोळी आणण्याइतकी मी मोठी होते...तरीही ती तुम्हीच आणून देण्यात वेगळीच माया होती. मी सासरी गेल्यानंतरही माझे सगळे हट्ट पुरवण्यात तुम्हालाही हौस होती...आणि म्हणे...मी कधी मोठी झाले कळलच नाही...२२ जुलै २०१६...मला म्हणालात अगं पाठीत दुखतय गेल्या दोन दिवसांपासून... मग सर्दी झाली..कफ साचला. खोकला वाढला. त्रास होतोय असं तुम्ही असं म्हटल्यावर मला कुठला दम निघतोय. आपण दवाखान्यात गेलो ते थेट डॉक्टरांनी सोनोग्राफीच केली. निदान होतं...हलकासा हार्टअॅटॅक येऊन गेलाय...काळजी घ्या...खरं सांगायचं तर मी त्या क्षणी मोठी झाले. तुमच्याबाबतीत असं डॉक्टरी निदान ऐकल्यावर जी घुसळण व्हायची ती झालीच. पुढच्याच आठवड्यात घरी तुम्ही दोघच असताना अचानक तुम्ही कोसळलात...पण त्याही क्षणी म्हणालात दवाखान्यात न्यायला अनूला फोन करा...त्या क्षणी मी खऱ्याअर्थाने मी मोठी झाले...दहाव्या मिनीटाला मी आले...आपण दवाखान्यात गेलो...उपचार झाले...आठवडाभरात तुम्ही घरी आलात...मला म्हणालात...तुझा खूप आधार वाटतो मला....त्या दिवशी मी खरोखर मोठी झाले. ते वर्ष छान गेलं. आपण तासनतास बोलायचो...रात्री दहा वाजले की काशाच्या वाटीने गरम तेल तुमच्या पायांना चोळताना माझे हात तर मऊशार व्हायचेच पण आपलं नितळ नातंही मुलायम व्हायचं. मधूनच म्हणायचात तुम्ही...तुझा संसार आहे...नोकरीतील जबाबदाऱ्या आहेत...त्यात माझ्यामुळे तुझी धावपळ होते...मला अपराधी वाटतं गं...मग माझा पारा चढायचा...मी चक्क रागवायचे तुम्हाला...अन् तुम्ही ऐकून घ्यायचात...तेव्हा मी मोठी झाले वेगळ्या अर्थाने...
वर्षभराने तुमची तब्येत बिघडत गेली. २०१७च्या श्रावणात तर तुम्ही निर्वाणीच्या गोष्टी करायला लागलात अन् मला घरातल्या जबाबदाऱ्यांची यादी सांगायला लागतात तेव्हा तर मी आता लहान राहिलेच नाही की काय हे पक्कं झालं...तुम्ही मला हे काही सांगूच नका असं म्हणायचे मी कित्येकदा...माझं काही आता खरं नाही गं हे तुमचं वाक्य पोखरून काढायचं मला आतपर्यंत. शेवटी तुम्ही तुमचं खरं केलं...५ ऑक्टोबर २०१७ या तुमच्या अत्यंत आवडत्या दिवशी कोजागिरीलाच तुम्ही आमचा निरोप घेतला. कोजागिरी....आजही आठवते ती प्रत्येक रात्र...तुम्ही शिकवलेली गाणी मी म्हणायची आणि घरातील डब्यांचा तबला करायचा तुम्ही. आपल्या सगळ्यांचे सूर एकत्र यायचे...एक छान हसतंखेळतं...मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव नसलेलं...वडीलांची भीती वाटावी असा धाक नसलेलं...स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील पुसटशी रेष जपण्याचं भान असलेलं...आईवडीलांशी मनमोकळा संवाद असलेलं जग आपल्या कुटुंबात होतं...
जाण्याच्या आदल्या दिवशी म्हणालात...मी गेलो तर रडायचं नाही...जन्म आहे तिथं अंत असतोच... पण तुम्ही माझ्या आयुष्यातील सावलीचं झाड होतात...ते उन्मळून पडल्यानंतर माझं कोसळणं स्वाभाविकच होतं... आणि रडणं म्हणजे काही फक्त डोळ्यातून पाणी येणं असं नाही...आतूनही रडतो अनेकदा माणूस...ती पोकळी भरणारं कुणी नसेल तर दुसरं काय होणार...पण तरीही रडत बसायचं नाही हे तुमचे शब्द ठेवा आहे माझ्यासाठी...तो आयुष्यभर जपणारच आहे...कारण मी खरच आता मोठी झालेय...मला व्हायचं नव्हतं तरीही झालेय....तुमच्यासाठी पप्पा...
Comments