सणासुदीचं सुग्रास कोल्हापूर



                                                       सणासुदीचं सुग्रास कोल्हापूर

                                                                 @ अनुराधा  कदम, कोल्हापूर 



कोल्हापूर म्हटलं की झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, चुलीवरची खरपूस भाकरी, खुळा रस्सा, सुक्कं मटण  ही ओळख समोर येते. धुळवड, किंक्रांत, नवरात्रीतली अष्टमीला कोल्हापुरातल्या पेठांमधल्या घरात मटण शिजणारच. घरच्या गणपतीला निरोप देऊन येताना मटणाची पिशवी घेऊन यायची हा इथल्या कित्येक घरातला शिरस्ताच. पाहुणा घरी आला की त्याच्यासाठी मटणाचा बेत न करणारं घर शोधून सुद्धा सापडायचं नाही. तर कोल्हापूर आणि तांबडापांढरा हे समीकरण असं घट्ट जुळलेलं. मात्र मटणावर ताव मारणारे कोल्हापूरकर बारमाही सणावाराला होणाऱ्या गोडाधोडानेही जिभ तृप्त करतात हे पण तितकच खरं. संक्रांतीच्या पोळीपासून डिसेंबरातल्या मार्गशीर्षातल्या गुरूवारच्या शेवयाच्या खिरीपर्यंत कोल्हापुरातल्या घरांमध्ये सणावाराचे अस्सल पारंपरिक ताटही सुग्रासपणे सजतं. खाण्यावर बेंबीच्या देठापासून प्रेम करणाऱ्या कोल्हापूरकरांची खवय्येगिरी ही अशी सणासुदीलाही यथेच्छ सुरू असते.
बारा महिन्याच्या प्रत्येक खाद्यवैशिष्ट्य जपण्याची परंपरा आजही कोल्हापुरात टिकून आहे. विशेषता कोल्हापूर शहराच्या जुन्या परिसरात पोळीच्या सणाला डाळ घातली जातेच. पाटवडीपासून आंबिलपर्यंत आणि कानुल्यांपासून धपाट्यापर्यंत अगदी सगळा पाककलेचा घाट कोल्हापुरात सणासुदीला घातला जातोच. बुधवारी, रविवारी ताटात भाजी दिसली की आज भाजी ? असा प्रश्न करणारा प्रत्येक कोल्हापूरकर या गोडाधोडावरचाही यथेच्छ समाचार घेतो. 
संक्रांतीचा ओवसा पूजल्यावर बाजरीची तीळ लावलेली भाकरी हा मेन्यू म्हणजे कोल्हापुरातील संक्रांतीचा रांगडा गोडवा. वरणंवांग्याची भाजी,कांद्याची पात, गाजर, हरभऱ्याचं धाटं, वाटाणा, भुईमुगाची शेंग भाकरीवर ठेवून शेजारीपाजारी वाटण्यात वेगळाच आनंद. पदार्थ सारखेच, पण शेजारच्या घरातून आलेल्या संक्रांतीच्या भाकरीच्या ताटाकडे लागलेली नजर काही औरच. हुंड्याच्या पौर्णिमेचे वेध लागले की बाजरीचं पिठ भरडून त्याची तळव्यावर निगुतीनं वाटी करायची आणि ती वाफाळत्या पाण्यावर चाळणीत ठेवायची हा घराघरातील ठरलेला खाद्यप्रपंच. हुंडे कुसकरून त्यात दूधसाखर घालून खाण्याचं सुख कोल्हापुरातल्या खवय्ये अगदी भरभरून लुटतात. फेब्रुवारीने हाक दिली की कुलधर्म पौर्णिमेलाच इकडे पोळ्याची पौर्णिमा म्हणतात. कुलाचाराला खाद्यसंस्कृतीची जोड द्यावी तर कोल्हापूरकरांनीच. गुढी उभी केली की घरातल्या महिलावर्गाची लगबग पोळ्यांचे मिशन फत्ते करण्यासाठी सुरू होते. धुलवडीला जरी घराघरात रस्सा उकळणार हे समीकरण असले तरी होळीदिवशी पुरणपोळीला पर्याय नाही म्हणजे नाही. गुळचाट झालेल्या जिभेला मग किक्रांतीचा रस्सा तिखट करतो. एप्रिलमध्ये येणारी अक्षय्यतृतीयाही पुरणपोळी आणि गव्हाच्या दामटीशिवाय अपुरीच. 
कोल्हापूर परिसरातील ग्रामीण भागात तर बेंदराचं खडूगळं करण्याची मजा असतेच, पण शहरातील घरांमध्येही बेंदूरच्या आधी डाळपीठाचे कडबोळे अर्थात कोल्हापूरी भाषेत खडूगळ्याचा खडखडाट तोंडात व्हायलाच पाहिजे. आता तांदळाच्या पिठीत मोहन घालून खुशखुशीत कडबोळेही होतात बेंदराला. बेंदराची पोळीही अगदी न चुकता खाल्ली जाते. भुरूभुरू पावसाची सुरूवात झाली आणि  नागुबं घ्या नागुबं अशी हाळी देत येणाऱ्या कुंभारगल्लीतल्या महिला गल्लीत आल्या की  नागपंचमीची चाहूल लागते. जोंधळ्याच्या लाह्या चूटचूट आवाज करत फुलतात आणि सोबतीने ओल्या नारळाच्या करंज्या अर्थात कानुलं ताटात दिमाखात येतात. श्रावणातही पुरणावरणाचा बेत वरपला जातोच.  गौरी गणपतीचा सण म्हणजे कोल्हापुरात खाण्याची चंगळच. रसरशीत भाज्या, खीर,मोदक यांचा नुसता अभिषेक सुरू होतो. गौरी आगमनादिवशी आल्यापाल्याची भाजी आणि तांदुळाची भाकरी म्हणजे गावरान मेन्यूच. तर गणपतीच्या नैवेद्याचे निमित्त करून खपली गव्हाची खीर,मोदक खावे आणि दुपारी झोप काढून थेट संध्याकाळच्या आरतीलाच उठावे हा पट्टीच्या कोल्हापूरकरांचा नेम काही चुकणार नाही. नवरात्रात तर म्हणायला उपवास, पण रेलचेल सुरूच. रताळ्याच्या खिसापासून ते काचऱ्यापर्यंत हरतऱ्हेचे पदार्थ नवरात्रातील दरदिवशी कोल्हापुरातील घराघरात सुखाने नांदतात. देव बसले की नऊ दिवस गोडाधोडाचा फक्त पाऊस सुरू असतो जेवणाच्या ताटात. अष्टमीला भवानीच्या चौकाला बांधण्यासाठी घराघरात एखाद्या दुपारी कडाकणी करण्याचा दिवस ठरतोच. रवापिठ्ठीत साखरेचा पाक घालून घट्टसर मळून केला जाणारा कडाकणी हा पदार्थ फक्त कोल्हापूरच्या दसऱ्यातील खासियत. कडाकणीच्या शेवटच्या घाण्यात वेणीफणी,हात, करंडा, जोडव्या करायच्या, चौकाला बांधायच्या आणि देव उठले की त्यावर ताव मारायचा हे कोल्हापूरकरांइतकं कुणालाच माहिती नसेल. कडाकणीचा डबा रिकामा होतो न होतो तोपर्यंत पंधरा दिवसांवर दिवाळी आलेलीच असते. मग सुरू होते फराळाची लगीनघाई. बुंदीच्या लाडवाचं कोल्हापूरी नाव म्हणजे कळीचे लाडू. पुडाची वडी ज्या पद्धतीने कोल्हापुरात केली जाते तिची बांधणीच वेगळी. आत अगदी मटणाला घालावा तसाच साग्रसंगीत मसाला. चिवड्याची फोडणी असो किंवा चकलीची भाजणी. लाडवाचा पाक असो किंवा सारणाचा गोडवा सगळं काही अगदी कोल्हापूरी चवीनंच. 
जत्रा, यात्रा, नव्यापाण्याचा नैवेद्य, नव्या धान्याचा आनंद अशानिमित्ताने पिवळीचुटूक पाटवडी, आंबटगोड आंबिल, अमृतफळं, मुटके, घाऱ्या या गोडतिखटाच्या कोल्हापुरी पदार्थांनी जिभेचे चोचले पुरवल्याशिवाय काही कोल्हापूरकारांना चैन पडत नाही. 
थोडक्यात काय, तर जरा कट घाला की असं म्हणत मटणावर जीव ओवाळून टाकणारी कोल्हापूरची खवय्येगिरी सणासुदीच्या गोडव्यासाठी तितकीच आतूर असते हे नक्की.


कोल्हापूरची पारंपरिक चव
कानुलं ,पाटवडी, आंबिल, घाऱ्या, आल्यापाल्याची, भाजी, कडाकणी ,खडूगळं, हुंडे, मुटके


Comments

सुंदर मांडणी

Popular posts from this blog

सिंक...मी आणि मावशी

जीवनाचे गणित