रंकाळ्यावरील पाऊसवाट

रंकाळ्यावरील पाऊसवाट ....

@अनुराधा कदम, कोल्हापूर

टपोरे दुधाळ ढग जणू रंकाळ्याच्या पाणीदार ओंजळीत आलेले...जिथे नजर संपेल तिथे अंधारून आलेला आसंमत...तलावातील तरंगांवरून येणारी थंडगार झुळूक थेट मनाच्या गाभाऱ्यात पोहोचणारी आणि अशा वातावरणात रंकाळ्याच्या दगडीकाठांनाही फुटलेला ओलेता पाझर...पावसाच्या रिमझिम सरी झेलत रंकाळ्याची ही सफर केवळ अविस्मरणीय. तलावातील प्रवाहात पावसाच्या थेंबांनी तयार होणारी नक्षी पाहत काठावरून एकेक पाऊल पुढे टाकताना पाऊसमय रंकाळ्याची अनुभूती मनाला ओलेचिंब करून जाते.

ताराबाई रोड संपला आणि रंकाळा चौपाटीकडे जाणारी पहिली पायरी चढून शेवटच्या पायरीवर आलं की समोरच्या विशाल प्रवाहातून येणारी वाऱ्याची झुळूक अंगांवर झेलायचा अवकाश की पश्चिमेचा तो शहारा रोमांचकारीच. इथला रिमझिम पाऊसही वाऱ्यामुळे झोंबणारा वाटला तरी त्याचं ते झोंबणं तितकंच लाघवी. दगडी काठावर मायेचा हात फिरवत पुढे जावं आणि दगडावर पहुडलेल्या थेंबांनी हात ओले करता करता मनही ओले व्हावे... हा अनुभव तर भन्नाटच. पायात साठलेल्या पाण्याला छेडताना आपल्यातील अवखळपणा पावसाच्या साथीने जरा जास्तच बहरतो. रंकाळ्याभोवतीच्या रिंगणातून वारा पित जाताना पावसाचं गाणं कधी ओठावर येतं कळतच नाही. पाऊसकविता मनाच्या  किनाऱ्यावरील वाळूत रेघोट्या मारायला लागतात.. कुठल्याशा जुन्या चारोळ्या आठवणीची निसरगाठ सोडून मोकळ्या होतात. रंकाळ्यावर पाऊस कितीही  मुसळधार पडला तरी तो गुलाबीच वाटतो.

वाट मागे सारत टॉवरच्या मध्यावर येताच डावीकडे मान वळवली की राजघाटावर पाऊल थबकते.  घाटावरच्या पायरीवर क्षणभर थांबण्याचा मोह अस्वस्थ करून गेला तरी रसिकता अजूनही पावसासारखी ओलेतीच. पुढे छान वाट असतानाही घाटपायरीवरचा विसावा पावसाच्या गावी नेल्याशिवाय राहत नाही. खूप दिवसांच्या विरहानंतर आपलं माणूस आपल्या दिशेने बेभान होऊन यावं आणि घट्ट मिठीत घ्यावं तशी पावसाची सर वाऱ्यासोबत आपल्याला कवेत घेते. बंद डोळ्यांनी हा अनुभव पावसात एकदा जगून बघावाच. न राहवून राजघाटाच्या पायरीवरून उठायला हवं कारण पुढेच खरा रंकाळा असतो. टॉवरमार्गावरच्या फरशीवजा वाटेचा निरोप घेत पुढे आलं की शालिनी पॅलेससमोरील बाग जणू साद घालतच असते. पाऊस रिमझिम असो किंवा मुसळधार, कधीमधी येणाऱ्या एखाद्या सरीसारखा असो किंवा संततधार, रंकाळ्यावर तो आपल्या आतही बरसतो.

रंकाळाटॉवर बागेत पाऊस जरा जास्तच रोमँटिक होतो. झाडांलगत असलेल्या बेंचवर बसून रंकाळ्याला न्याहाळणं आणि शेजारच्या झाडांवरून अंगावर पडणारे थेंब झेलणं यासारखे सुख नाही... ही भावना तरल होते अगदी. पायवाटेत  कधी माती तर कधी गवत, कधी खडी तर कधी गुलमोहराच्या पाकळ्या. पावसाच्या सरींमध्ये ही पायवाट वेगळाच गालिचा अंथरते आणि सोबत कुणी जवळचं असेल तर पावसाचा खोडकरपणा रंकाळ्याच्या साक्षीने अधिकच गहिरा होतो. शालिनी पॅलेससमोरच्या बागेत रिमझिम पावसात रंकाळ्यातील पाणी नुसतं बघत बसलं तरी दिवस सरणारही नाही आणि पुरणारही नाही. खरंतर बसण्यासाठी एकही जागा कोरडी उरलेली नसते, तरीही ते ओलेपण हवंहवंसं वाटतं. ही अख्खी बाग पावसाच्या सोबतीने पायाखालून घालत पुढे लागते ते पदपथ उद्यान. इथे ऐन भरात आलेल्या पावसात आलं तर हा परिसर व्यापून टाकतो. वारं अंगावर येतं. पाण्याचा गारवा अंगावर काटा फुलवतो.

मऊशार हिरवळीवर तर कधी कडेकडेने मातीखड्यांची वाट चालत रंकाळ्याच्या काठाशी सलगी करत पाऊस झेलतानाची सफर करायला एखादी पावसाळी सायंकाळ  फिरून  बघावीच. पदपथ उद्यानाचा मोकळा परिसर संपवून पुढे गेल्यानंतर चिंचोळी नागमोडी वाट आणि दुतर्फा झाडांच्या कमानीचा परिसर पावसाळ्यात अगदी भन्नाट. कधी सर्रकन नजरेसमोरून जाणारी खारुताई भेटते तर एखादे फुलपाखरू उडत डोळ्यासमोर येते. झाडांच्या पानावरून टपकन थेंब खालच्या पाण्यात पडतो तो आवाज या वाटेवर चालताना तबल्याच्या तालालाही मागे टाकतो. पानांची सळसळही ओलीचिंब होते. पक्ष्यांची किलबिल पावसाळी वातावरण नादमय करते. पदपथाच्या पुढे खण आणि तिथूनच झुलत्या पुलावरून पुढे गेल्यानंतर शाहू उद्यानाच्या दिशेने चालण्याचा आनंद पावसाच्या साथीने त्याच्यासारखाच पाणीदार होतो.

Comments

Rahul Pawar said…
सुंदर वर्णन 👌👌

Popular posts from this blog

सिंक...मी आणि मावशी

कृष्णकिनारा

क्यू की बोलना जरुरी है बॉस...