रंकाळ्यावरील पाऊसवाट
रंकाळ्यावरील पाऊसवाट .... @अनुराधा कदम, कोल्हापूर टपोरे दुधाळ ढग जणू रंकाळ्याच्या पाणीदार ओंजळीत आलेले...जिथे नजर संपेल तिथे अंधारून आलेला आसंमत...तलावातील तरंगांवरून येणारी थंडगार झुळूक थेट मनाच्या गाभाऱ्यात पोहोचणारी आणि अशा वातावरणात रंकाळ्याच्या दगडीकाठांनाही फुटलेला ओलेता पाझर...पावसाच्या रिमझिम सरी झेलत रंकाळ्याची ही सफर केवळ अविस्मरणीय. तलावातील प्रवाहात पावसाच्या थेंबांनी तयार होणारी नक्षी पाहत काठावरून एकेक पाऊल पुढे टाकताना पाऊसमय रंकाळ्याची अनुभूती मनाला ओलेचिंब करून जाते. ताराबाई रोड संपला आणि रंकाळा चौपाटीकडे जाणारी पहिली पायरी चढून शेवटच्या पायरीवर आलं की समोरच्या विशाल प्रवाहातून येणारी वाऱ्याची झुळूक अंगांवर झेलायचा अवकाश की पश्चिमेचा तो शहारा रोमांचकारीच. इथला रिमझिम पाऊसही वाऱ्यामुळे झोंबणारा वाटला तरी त्याचं ते झोंबणं तितकंच लाघवी. दगडी काठावर मायेचा हात फिरवत पुढे जावं आणि दगडावर पहुडलेल्या थेंबांनी हात ओले करता करता मनही ओले व्हावे... हा अनुभव तर भन्नाटच. पायात साठलेल्या पाण्याला छेडताना आपल्यातील अवखळपणा पावसाच्या साथीने जरा जास्तच बहरतो. रंकाळ्याभोवतीच्या ...