जीवनाचे गणित
माणसाच्या आयुष्यात सारेच गणित आहे. त्याच्या आयुष्यात ठराविक टप्प्यातकाही विशिष्ट बदल होत जातात. काय मिळवायचे...कसे मिळवायचे याचे वेगवेगळे हिशोब मांडले जातात. बेरीज.. वजाबाकी..गुणाकार..भागाकार...या साऱ्या गणिताच्या प्रकारांनी मानवी जीवन व्यापले आहे. जीवनातील सर्व गणिते नेहमीच बरोबर येतात असे नाही...भाग जाऊन बाकी शून्य येते असेही नाही. आयुष्याच्या प्रमेयांमध्ये सिद्धांताच्या दिशेने जाताना साध्य गाठले जाईल असेही नाही. कधी सुटतात तर कधी ती अडून बसतात. बेरीज वजाबाकीचा पेच सुटण्यासाठी हातची संख्या कधी हाताशी नसते तर असूनही कुणी हात पुढे करत नाही. थोडक्यात काय...जीवनातील गणितं नेहमीच बरोबर येतात असे नाही...पण गणितं ही मांडली जातातच. या गणिताची एक मोठी गंमत आहे. या गंमतीनं गणितशास्त्राचा एक महत्त्वाचा नियम अक्षरश: धाब्यावर बसवला आहे. नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा जाते... पण आयुष्याच्या गणितात हा नियम लागू होत नाही बरं का....माणसाच्या सत्यकृत्यांची संख्या कितीही मोठी असली तरी त्याचे एखादे दृष्कृत्यही त्यातून वजा होऊ शकत नाही. अनुराधा कदम