तुफान आणि ज्योत
जगात तुफान हे नेहमीच प्रबल ठरत आले आहे. तुफान हा अविचाराचा आविष्कार असतो. चांगल्या गोष्टींमध्येसुद्धा सुसंगती व संयम राहिला नाही तर त्यातून तुफान निर्माण होते. तुफान प्रबळ ठरत आले आहे हे खरे…पण त्याबरोबरच ते नेहमी क्षणभंगूरही ठरले आहे. मात्र क्षणभंगूर असले तरी युगायुगाच्या निर्मितीची शकले उडवण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी असते हे लक्षात घेतले पाहिजे.
तुफानाच्या तडाख्यात सापडलेल्या जगात जीव मुठीत धरून जगणाऱ्यांची संख्या कितीही मोठी असली तरी निर्भयपणे तेवत राहणाऱ्या काही ज्योतींनीच जगाला जगवले आहे हे विसरून चालणार नाही. तुफानाशी टक्कर देणारे बहुधा स्वत:ही तुफान असतात आणि म्हणूनच लयाला जातात. तुफान अंगावर घ्यावे आणि त्याला हळूवारपणे कुरवाळून त्याच्याच गतीनं त्याला त्याच्यावर मात करावी हा शहाणपणा ज्योतीजवळ असतो म्हणूनच ती अनंत तुफाने झेलतही तेवत राहते.
तुफानाशी संगनमत करून जेव्हा ज्योतीवरच हल्ला केला जातो तेव्हा मात्र जगात केवळ अंधाराचे साम्राज्य पसरते.
निमित्ताचे शब्द....
@ अनुराधा कदम
Comments