अपेक्षा


अपेक्षा…आणि आयुष्य 


हे असं व्हायला हवं... ते तसं झालं तर… असं काही होईल अशी अपेक्षाच नव्हती… वाटलं नव्हतं आयुष्य अशाप्रकारे फिरकी घेईल… कधी मनात येतात ही अशी वाक्ये… आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या , किंवा घडाव्या असे वाटणाऱ्या गोष्टी नाही घडल्या की हे शब्द सहजपणे ओठावर येतात. शब्दांना गुंफणाऱ्या लेखकांनी असं म्हटलय की अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर अपेक्षाभ्ंगाचे दु:ख होत नाही. पण माणसाला जशा भावना असतात तशा कल्पनाही असतात. आपण अनेकदा आपल्या आयुष्याचे एक कल्पक चित्र रेखाटत असतोच की… तारूण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकणारी तरूणी तिच्या आयुष्याच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षांचे टिंब जोडत तिच्या डोळ्यातला त्याचा चेहरा तयार करत असते. शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसायाच्या संधींच्या विश्वात येऊ पाहणारे तरूण त्यांच्या यशस्वी आयुष्याचा आलेख मांडत असतात. मुलाबाळांनी मार्गी लागावं हीच तर अपेक्षा असते ना आईवडीलांची. मुलीला तिच्या कलागुणांना वाव देणारं चांगलं सासर मिळावं, घरात येणारी सून दुधात साखर विरघळावी तशी एकरूप व्हावी अशाच अपेक्षांचा सूर्योदय होत असतो आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात. अपेक्षा म्हणजे काय तर एक समाधानपूर्तीचे वर्तुळ पाहण्याची आंतरिक इच्छा. खरं तर एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडेपर्यंत मनात आकाराला येणारा अपेक्षांचा मनोरा अनुभवणं हा एक वेगळाच प्रवास असतो. गंमत म्हणजे अपेक्षा सकारात्मकच असते असेही नाही तर ती नकारात्मकही असते. माणसाला त्याच्या अपेक्षेनुसार काय घडायला हवे आहे यावर त्याच्या मनात अपेक्षांची एक परिभाषा तयार होत असते. एखादं माणूस यावं असं ज्याप्रमाणे आतून वाटतं तसंच एखादं माणूस त्या क्षणी येऊच नये अशीही अपेक्षा असू शकते. वास्तव वेगळं असू शकतं..पण परिस्थिती काय आहे यावर माणसाच्या अपेक्षांचा लोलक फिरत असतो. अपेक्षा करणं नक्कीच चुकीचं नाही, मात्र ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर वास्तव स्वीकारण्याची प्रगल्भता असणं यामध्ये माणसाची पक्वता दिसते. अपेक्षा ठेवली नाही की अपेक्षाभंगाचे दु:ख होत नाही या विधानाला छेद बसतो तो इथंच. अपेक्षा ठेवूनही त्यानंतर मनासारखे न घडणारे वास्तव झेलत जो मार्ग पत्करला जातो तो अधिक ठाम असू शकतो. भानावर आणणारा… जे आहे ते स्वीकारून पुढे जाण्याची धमक देणारा… आपल्यातील उणेपणाचे तण काढून आयुष्यात हिरवळ फुलवणारा. स्वप्नातही वाटले नव्हते असे होईल असं म्हणत अपेक्षांचा चुराडा करण्यापेक्षा त्या स्वप्नालाच सत्याची वाट दाखवणारा. जीवनाचा अंत करणं हा एका क्षणाचा खेळ असतो. अपेक्षाचा मनोरा कोसळला म्हणून जीवनाचा महाल जमीनदोस्त करण्याचा विचार करायला बुद्धी लागत नाही.  अपेक्षाभंगांतून येणाऱ्या नैराश्याने आयुष्याची रात्र करणाऱ्यांनी तर या अपेक्षांचा नवा अर्थ शोधावा. पानगळीनंतर जसं झाड नव्या पालवीने टवटवीत होतं तसंही आयुष्य जगता आलं तर अपेक्षांचं ओझं वाटणार नाही. घरावरच्या कौलातील फटीतून डोलत असतंच की एखादं इवलंसं रोप…दगडाच्या खाचेतूनही उगवतात अशी पानं… आता काहीच होऊ शकत नाही म्हणत आयुष्यच संपवणाऱ्यांनी, अपेक्षांनी भरली घागर बुडल्यामुळे जगण्यातच अर्थ नाही म्हणणाऱ्यांनी एकदा पहावं त्या फटी, खाचांतून जगू पाहणाऱ्या फांद्यांकडे… आयुष्य सुंदर आहे... गरज आहे ती त्याच सुंदर दृष्टीने पाहण्याची. अपेक्षांचा जिलेटीन पेपर नजरेआड केला तरच त्यावरचे उसने रंग बाजूला सारले जातील आणि दिसेल एक स्वच्छ व निर्मळ आयुष्य…जे फक्त स्वच्छंदी असेल…कुठल्या अपेक्षांच्या ओझ्यांनी दबलेले नसेल.

@अनुराधा कदम, कोल्हापूर



Comments

Popular posts from this blog

सिंक...मी आणि मावशी

कृष्णकिनारा

क्यू की बोलना जरुरी है बॉस...