कशासाठी शिकायचं....?
कशासाठी शिकायचं… आयुष्य संपवण्यासाठी की घडवण्यासाठी?
अनुराधा कदम, कोल्हापूर
कर्नाटकातून
महाराष्ट्रात आजोळी शिक्षणासाठी राहणारी मुलगी. मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे
आईला घर चालवण्यासाठी उंबरठा ओलांडण्याशिवाय पर्याय नव्हता. पदरी एक शाळकरी वयातील
मुलगी. दिवसभर कामासाठी बाहेर राहताना त्या आईचे लक्ष मुलीच्या सुरक्षेकडेच. मग
गडहिंग्लजमधील माहेरी मुलीला शिक्षणासाठी ठेवायचे तिने ठरवले. शाळकरी वयातून पोर
कॉलेजात आली. काही दिवसात ती पदवी घेईल. जमली तर दोनचार वर्षे नोकरी करेल मग लग्न करून देऊ अशा
विचाराने पोरीची आई सुखावली होती. मायलेकींचं एकमेकीवर अगदी जीवापाड प्रेम.
मुलीनेही वडिलांच्या जाण्यानंतर आईची धडपड पाहिली होती. आईच्या कष्टाची तिला जाणही
होती. म्हाताऱ्या आजीआजोबांसाठी तर ती दुधावरची साय. रोज रात्री आईसोबत खुशालीचा फोन
शिरस्ताच झाला होता. सगळं कसं अगदी आखीव रेखीव सुरू होतं. मार्च मध्ये करोनामुळे
कॉलेज बंद झालं. मग प्रवासावर बंधने आली. इथे तर मुलगी महाराष्ट्रात आणि आई
कर्नाटकात असल्याने भेटण्याचा मार्गही बंद झाला. पण तिथे आई आणि इकडे मुलगी
सुखरूप, सुरक्षित होते. काळजीचं कारण नव्हतं. पहिला महिनाभर फोनवरचा संवाद,
व्हिडिओ कॉल छान सुरू होता. मग मात्र मुलगी शांत शांत राहू लागली. उदास वाटू
लागली. अनुभवाचे पावसाळे पाहिलेल्या आजीआजोबांनी तिला गोंजारलं. आईच्या आठवणीने
व्याकूळ होणाऱ्या नातीला मायेच्या पंखाखाली घेतलं. थोडं शिथिल झालं की आईला बोलवून
घेऊया अशा धीराच्या शब्दांनी आधार दिला. तिकडून
आईनेही मुलीची समजूत काढली. त्या क्षणी लेकीला पटायचं पण आत काहीतरी वेगळाच विचार
सुरू होता. एकदा तडक उठली आणि वाटेलाच लागली पोर. मुलगी तशी समजूतदार, पण त्या
दिवशी आजीआजोबा आपल्याला कुठं शोधतील याचाही विचार न करता बेळगावच्या रस्त्याला
लागली. कागल नाक्यावरच्या पोलिसांनी पुढे पाठवलं नाही म्हणून नाईलाजास्तव घरी आली.
आईला भेटायचंय एवढच म्हणून आजीच्या मिठीत घुसली. आजोबांच्या गळ्यात पडली. पण
परिस्थितीच अशी नव्हती की तिची आईशी भेट होईल. त्याच रात्री गळफास लावून तिने जीवनयात्राच संपवली. तिकडे आई सुन्न…इकडे
आजी आजोबा हताश. पुढच्या वर्षी कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं तिचं. कॉमर्सची पदवी घेऊन
आईचा आधार बनली असती. आजीआजोबांचा अभिमान बनली असती. पण शिक्षणाने तिला शहाणं नाही
केलं. मार्कांसाठी अभ्यास करत राहिली आणि आयुष्यात भावनिक परीक्षा देण्याची वेळ
आली तेव्हा नाही जमलं तिला सामोरं जाणं. अर्थशास्त्र शिकताना आयुष्यात आईने
खालेल्या खस्तांचा हिशोब मांडता नाही आला तिला. आठ वर्षाची असताना तिचे वडील गेले,
त्यानंतर तिला वाढवण्यासाठी आईने १२ वर्षे आईने केलेल्या एकाकी तपश्चर्येचा
लेखाजोखा नाही मांडता आला तिला. आम्ही आहोत नातीची काळजी घ्यायला… तू फक्त तुझ्या
नोकरीत लक्ष दे या आजीआजोबांनी त्यांच्या लेकीला दिलेल्या शब्दाचाच गळा घोटताना नात्याची
वीण नाही गुंफता आली तिला. मान्य की, नात्यात जमाखर्चाची गणितं मांडायची नसतात…
दिल्याघेतल्याची बेरीज वजाबाकीही करायची नसते. पण प्रेम, माया, जाणिवा यांचा
गुणाकार तर नक्कीच करता येतो. आपल्यासाठी झिजणाऱ्या…आपल्यासाठी स्वप्नं पाहणाऱ्या,
प्रसंगी हौसेमौजेला मुरड घालणाऱ्यांना समाधानाची पूंजी तर देऊ शकतोच ना आपण…. आयुष्य
संपवायला एक क्षण लागतो… पण आयुष्य घडवायला तोच एक क्षण लाथाडून पुढे जाण्याचे
शहाणपण देणारे शिक्षण हवे. शिकायचं कशासाठी हा विचार मनात येईल तेव्हा आयुष्य
संपवण्यासाठी की आयुष्य घडवण्यासाठी हा प्रश्न विचारून पाहणारी मनं भक्कम झाली तरच
पहाट आहे…नाहीतर सगळा अंधारच असेल... आयुष्यात चाचपडायला लावणारा….
Comments