भरलं वांगं

भरलं वांगं

@अनुराधा कदम

आपल्या आहारामध्ये वांग्याची बातच न्यारी. मुठीत मावणाऱ्या आकाराची फिकट हिरव्या रंगाची किंवा आमसुली रंगाची शिरेदार वांगी सुरगणीच्या नजरेला पडली रे पडली की तिला वांग्यांच्या खाचांमध्ये भरलेला मसाला, ती तेलात टाकलेली कांद्याची फोडणी, तेलात कांदा परतेल तसे सुटणाऱ्या तेलातून चमकणारा कट दिसायला लागतो. आधी जर कढईत चमचाभर तेलात परतून तपकिरी झालेली वांगी असतील तर मग खाताना त्याचा लुसलुशीपणा जिभेंवर रेंगाळतो.
तर आपण होतो बाजारात... भाजी खरेदीला गेलेल्या सुगरणीला गावाकडच्या भाजीवालीकडे मनासारखी वांगी दिसली की ती अर्धी लढाई इथेच जिंकते. हाऱ्यात नेटाने मांडणी केलेल्या वांग्यांच्या ताफ्यातून एकेक वागं भाजीवालीने दिलेल्या बुट्टीत काढताना तिने मध्येच हात घातला तर असा काही एक कटाक्ष टाकला जातो की बोलायची सोयच नाही.. त्या बघण्याचा अर्थ असा असतो की, मावशी, तुम्ही नका वांगी निवडू,,,मला भरली वांगी करायची आहेत त्यामुळे मी त्या मापाचीच घेणार. त्यामुळे एखादं मोठं, जून वांग खपवायच्या बेतात असलेली ती इरसाल भाजीवाली पट्टीच्या सुगरणीसमोर पामर होते हो. चांगली किलोभर वांगी पिशवीत स्वाहा झाली की मग सुगरणीची स्वारी त्यासाठी कोथिंबीरीची जुडी, आल्याचा वाटा, कढीपत्त्याची पेंडी असा चवीचा बाजार करून घर गाठते.  आज काय आहे रात्रीच्या जेवणात असा प्रश्न आला की टेकात तिचं उत्तर असतं की, आज भरली वांगीचा बेत आहे. तिच्या हातची भरली वांगी म्हणजे क्या बात...हा पूर्वानुभव असतोच तिच्या हातच्या चवीच्या चाहत्यांना. नवऱ्याची दोन, चिल्यापिल्यांची प्रत्येकी एकेक, सासूसासऱ्यांची दीड दीड आणि स्वत:साठी चांगली दोन वांगी आणि चव लागलीच कुणाला तर असावं एखादं जादाचं म्हणून  किलोभर भरलं वांग्याचा घाट घालताना तिच्यात हत्तीचं बळ येतं. पुढच्या अर्ध्या तासात वांगी खाचा पाडून पाण्यात डुंबायला लागतात. इकडे सुकं खोबर, कांदा, तीळ, धने भाजण्याच्या निमित्ताने तापल्या तव्यावर सुखाने तडतडतात आणि मीठाची चव घेत मिक्सरच्या भांड्यात एकजीव होतात.  मग त्यात दाण्याचा कूट, गरम मसाला आणि तिखटाची गट्टी जमते.  पाण्यातून काढून हलकीशी तेलावर परतलेल्या वांग्यांला  मिळालेल्या या वाफेने वांगीही मऊशार होतात.  खमंग मसाला वांग्याला दिलेल्या चार खाचांच्या कुशीत शिरतो.  तोवर तिने फोडणीसाठी कढई गॅसवर ठेवलेली असतेच. त्यात कांदा आणि उरलेला मसाला  आणि भरलेली वांगी सोडली, सोबत वाटीभर पाणी कढईत आणि थोडं पाणी झाकणावर ठेवलं की वांगी मसाल्याशी समरस होतात. पुढच्या अर्ध्या तासात अस्सा काही झणझणीत भरलं वांग्याचा घमघमाट सुटतो की कधी एकदा गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत भरली वांग्याचा घास तोंडात टाकतोय आणि अहाहा...याला म्हणायचं भरली वांगी अशी शंभर नंबरी  दाद देतोय असं होऊन जाईल बघा.

Comments

Popular posts from this blog

सिंक...मी आणि मावशी

कृष्णकिनारा

क्यू की बोलना जरुरी है बॉस...