रांगड्या विनोदाचा हुकमी पान ..... मकरंद अनासपुरे

रांगड्या विनोदाचा हुकमी पान .....

मकरंद अनासपुरे


आई, तू माझ्या लग्नाचा गोंधळ गावात घालशील गं,,,पण मी माझ्या राजकारणातील यशाने दिल्लीत गोंधळ घालेन… राजकारणावर चरचरीत भाष्य करणाऱ्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमातील हा डायलॉग ज्याच्या तोंडी आहे त्या अवलिया अभिनेत्याने खरोखरच अभिनयाच्या राज्यात आपल्या नावाने चांगलाच गोंधळ घातला आहे. हो आपण बोलत आहोत, वऱ्हाडी, मराठवाडी बोलीभाषेला ग्लॅमर देणाऱ्या मकरंद अनासपुरे या अभिनेत्याविषयी. २२ जुलै रोजी औरंगाबाद येथे जन्मलेले मकरंद अनासपुरे यांचा आज वाढदिवस. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या मकरंद यांची अभिनयाची कारकीर्द महाविद्यालयीन रंगभूमीपासून सुरू झाली आणि आज छोटा, मोठा पडदा गाजवत निर्मात, दिग्दर्शक म्हणून नाव कमावत ते ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत नाम फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरले आहेत.
मुळात कलाकार हा संवेदनशील असावा लागतो. त्याला समाजातील सुखाबरोबरच दु:खाचीही कणव असावी लागते. मकरंद  यांच्याकडे असलेला हा गुण त्यांच्यातील अभिनेत्याला पोषक ठरला. मराठवाडी भाषाशैली, साळढाळ देहबोली, संवादफेक करण्याची हटके स्टाइल आणि विजार शर्ट टोपी असा गावाकडचा पोषाखही सिनेमाच्या पडद्यावरचा हिट कॉश्च्यूम ठरू शकतो हे मकरंद यांनी दाखवून दिले ते केवळ आपल्या सकस अभिनयाने.
मकरंद शाळेत अगदी हुशार विद्यार्थी होते. अभ्यासात तर ते पहिल्या तीन नंबरात असायचेच पण शाळेतील विविध स्पर्धांमध्येही त्यांचा सहभाग होता. ४ थीत असताना शाळेतल्या नाटकात ते पहिल्यांदा रंगमंचावर उभे राहिले. त्यावेळी त्यांना बक्षीस म्हणून पेन्सील आणि खोडरबर मिळाला जो त्यांनी अजूनही जपून ठेवला आहे. अनेकदा ते गमतीने मुलाखतींमध्ये सांगतात की पेन्सिल लिहिण्यासाठी तर खोडरबर खोडण्यासाठी असतो. आयुष्यात या दोन्ही गोष्टी प्रतिकात्मक रूपाने आपल्याजवळ असल्या पाहिजेत. चुकीच्या गोष्टी खोडून त्या वेळीच दुरूस्त करता आल्या तर आयुष्य योग्य दिशेने जाते. त्यामुळेच बक्षीसरूपाने त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंसोबत त्यांची आयुष्याचे तत्वच जोडले आहे.
अभ्यासात हुशार असलेल्या मकरंद यांना खरंतर डॉक्टर व्हायचं होतं. पण मेडीकलला प्रवेश घेण्याइतके मार्क पडले नसल्याने त्यांनी आपला मोर्चा बीएस्सीकडे वळवला.  एकीकडे पदवीचा अभ्यास सुरू होता तर दुसरीकडे त्यांना सिनेमा, नाटक पाहण्याचीही आवड होती. त्याकाळात नाना पाटेकर यांचा अंकुश सिनेमा झळकला होता. हा सिनेमा मकरंद यांनी २६ वेळा पाहिला तो त्यातील नाना यांच्या अभिनयासाठी. नाना यांच्या अभिनयाने ते खूपच प्रेरित झाले. मेकअपचा कोणताही थर नसताना, छान दिसण्याच्या कोणत्याही व्याख्येत न बसताना केवळ अभिनयात काय ताकद असू शकते हे त्यांनी ओळखले. दरम्यान बीएस्सीनंतर त्यांनी नाट्यशास्त्रातील पदवीही मिळवली. त्यावेळी बीड, औरंगाबाद येथे एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होत मकरंद यांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला. या प्रवासात त्यांची भेट अभिनेता मंगेश देसाई यांच्याशी झाली. मुंबईत नाट्यदर्पण संस्थेतर्फे तेव्हा नाट्यस्पर्धा व्हायच्या. मंगेश मकरंदना या स्पर्धेत घेऊन आला. अभिनयाच्या जोरावर या स्पर्धेत मकरंद यांनी अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे मकरंद ज्यांच्या अभिनयाने प्रभावित झाला ते नाना पाटेकर या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे होते. मकरंदना या स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस तर मिळालेच पण नाना यांनी पाठ थोपटून मुंबईत तुला काय मदत लागली तर बिनधास्त माझ्याकडे ये हे शब्दही मिळाले. त्यानंतर पथनाट्य, एकांकिका असा प्रवास करत मकरंद मुंबईत आले. त्यावेळी त्यांच्या खिशात फक्त ५०० रूपये होते. राहण्याची व्यवस्था नव्हती. मग पहिले चार महिने त्यांनी आमदार निवासाचा आधार घेतला. मिळेल ते काम स्वीकारले. भूमिकेची लांबी न पाहता अभिनयाला प्राधान्य दिले. त्यावेळी वामन केंद्रे, चेतन दातार यांच्यासोबत झालं एकदाचं हे नाटक मकरंद यांना मिळाले. त्यानंतर दूरदर्शनच्या सुनं सुनं आभाळ या मालिकेत मकरंदनी रेखाटलेला खलनायक गाजला. बेधुंद मनाच्या लहरी, टिकल ते पॉलिटिकल हा शो यातून अभिनय सुरूच होता. जाउ बाई जोरात या नाटकाच्या प्रयोगाने मकरंदची कारकीर्द वेग घ्यायला लागली. याच वळणावर त्यांची भेट अभिनेत्री शिल्पासोबत झाली आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईत घर घेण्याचे स्वप्न आणि अभिनयक्षेत्रात स्थिरावण्याचे ध्येय असा दोन्हीचा प्रवास एकत्रितच सुरू झाला. सिनेमा, नाटक, मालिका या सर्वच माध्यमात मकरंद मिळेल ते काम करत होते. नाना पाटेकर यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मकरंद यांना काम मिळावे यासाठी मदत केली. वास्तव, या हिंदी सिनेमातही मकरंद भाव खाऊन गेले. तो काळ राजकारणावर बेतलेल्या सिनेमांचा होता. या लाटेत आलेल्या सरकारनामा या सिनेमाने मकरंद यांना चांगलाच ब्रेक दिला. त्यानंतर कायद्याचं बोला, दे धक्का, निशाणी डावा अंगठा, गाढवाचं लगीन, साडे माडे तीन, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, सुंबरान, खुर्चीसम्राट, गोष्ट छोटी डोंगराएवढी, दोघांत तिसरा आता सगळं विसरा, जाउ तिथे खाऊ, जबरदस्त, शुभ बोल नाऱ्या अशा ५० हून अधिक सिनेमात मकरंद यांनी आपल्या अभिनय, व खास स्टाइलची छाप सोडली आहे. डँबिस या सिनमाचे दिग्दर्शन व सहनिर्मितीमध्येही त्यांनी योगदान दिले असून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि गोष्ट छोटी डोंगराएवढी या सिनेमातील गाजलेले संवाद मकरंद यांच्या लेखणीतूनच उतरले आहेत.
मुळचा मराठवाड्यातील असल्याने मकरंद यांना दुष्काळाचे चटके काय असतात हे चांगलेच माहित आहे. त्यामुळे समाजाशी नाळ जोडलेल्या या अभिनेत्यातील माणुसकीचे दर्शन नाम या संस्थेतून होते. नाना पाटेकर यांच्यासोबत मकरंद यांनी नाम या फाउंडेशनची स्थापना केली असून याद्वारे दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी यांना आर्थिक मदत केली जाते. कॉमेडी शोचा परीक्षक म्हणून खळखळून हसणाऱ्या मकरंद यांच्या डोळ्यात शेतकऱ्यांसाठी असलेला ओलावाही खूप महत्त्वाचा आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Comments

Popular posts from this blog

सिंक...मी आणि मावशी

कृष्णकिनारा

क्यू की बोलना जरुरी है बॉस...