प्रत्यक्ष बोल...
काल संक्रांत झाली. तिळगूळ घ्या आणि गोड बोला असं लिहिलेले खूप संदेश आले.
सोबत तिळगूळ, तीळाची वडी...लाडू यांची संग्रहित छायाचित्रेही
आली....पिढ्यानपिढ्या आपण ‘तिळगूळ घ्या...गोड बोला‘ म्हणत आलो आहोत.
कालदेखील तीच री ओढली...वाईट काहीच नाही यामध्ये...पण मनात आलं की आजच्या
घडीला या वाक्यात हलकासा बदल झाला पाहिजे...नव्हे बदल केला पाहिजे. ‘तिळगूळ
घ्या आणि गोड बोला’ ऐवजी ‘तिळगूळ घ्या आणि प्रत्यक्ष बोला’ असे म्हणण्याचा
बदल...आता तुम्ही म्हणाल की, बोलतोच आहोत की आपण... व्हॉटसअॅपवरच्या डीपीला
किंवा फेसबुकवरच्या प्रोफाइल फोटोला नाही का आम्ही कमेंट देत...मस्त,
नाइस, सुंदर, वॉव...इत्यादी इत्यादी. एखादा किस्सा शेअर केला तर त्यालाही
अशीच एखादी प्रतिक्रिया दोनचार शब्दातली...पण ते तर चॅटिंग आहे ना...बोलणं
नाही. बोलण्यातला प्रवाहीपणा त्यात नाही...हसत हसत एखादी टाळी देणं तिथे
नाही...शब्दासोबत बोलणारे डोळ्यातले भाव वाचणं तर त्याहून
नाही...शब्दातल्या चढउतारातून भावनांचे हिंदोळे तिथे नाहीत...एकमेकांना
मध्येच थांबवून आपला मुद्दा पटवण्यातील संवाद नाही की मला काय म्हणायचे आहे
ते समोरच्याला समजले आहे की नाही हे दाखवणारी उत्स्फूर्त प्रतिक्रिया
ऐकण्यातला आनंदही नाही...त्यामुळे माझ्यापुरतं तर मी म्हणेन की तिळगूळ घे
आणि प्रत्यक्ष बोल...गोड...खरं....बरं की आणखी काही ते बोलून ठरवू ना...
तर...तिळगूळ घे आणि प्रत्यक्ष बोल...
Comments