माझं सावलीचं झाड माझं सावलीचं झाड होता तुम्ही....माझं लग्न ठरलं आणि तुम्ही मला म्हणालात...कधी तू इतकी मोठी झाली मला कळलच नाही बाळा... त्यादिवशी माझ्यातील अवखळपणाला पहिला धक्का लागला....मी मोठी झाले असं वाटण्यासाठी माझं लग्न ठरणं हे कारण ठरावं आणि ते तुम्ही बोलून दाखवावं...हे काही केल्या स्वीकारायला मन तयारच होईना. लग्नाच्या दिवशीही संध्याकाळी सगळं आटपल्यावर तुम्ही माझ्या जवळ आलात आणि म्हणालात....झालं ना सगळं तुझ्या मनासारखं....तेव्हाही माझं मन इतकं जपण्यापलीकडे तुम्हाला काही माहितीच नसल्याची नेहमीचीच प्रचिती मला आली. त्यादिवशी तुमच्या मिठीत मनसोक्त रडताना....तुमचा हात सोडून जाताना...सारखे सारखे मागे वळून पाहताना...तुमच्यातील ठाम माणूसही किती हळवं आहे हे जाणवलं. तुमच्या लेखी मी आता मोठी झाले होते असं असलं तरी मला मोठं व्हायचच नव्हतं. सरनाईकची कदम झाल्यानंतरही माझा तुमच्याजवळ हट्ट करण्याचा स्वभाव काही बदलला नाही. मला हे हवय...मला ते हवय, आत्ता द्या...गणपतीच्या सणात गौरीसाठी साडी आणायला गेल्यानंतर मला आवडलेली साडी हट्टाने मागून घेण्यात कुठेच खंड पडला नाही. ...
Comments