कशासाठी शिकायचं....?
कशासाठी शिकायचं… आयुष्य संपवण्यासाठी की घडवण्यासाठी? अनुराधा कदम, कोल्हापूर कर्नाटकातून महाराष्ट्रात आजोळी शिक्षणासाठी राहणारी मुलगी. मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे आईला घर चालवण्यासाठी उंबरठा ओलांडण्याशिवाय पर्याय नव्हता. पदरी एक शाळकरी वयातील मुलगी. दिवसभर कामासाठी बाहेर राहताना त्या आईचे लक्ष मुलीच्या सुरक्षेकडेच. मग गडहिंग्लजमधील माहेरी मुलीला शिक्षणासाठी ठेवायचे तिने ठरवले. शाळकरी वयातून पोर कॉलेजात आली. काही दिवसात ती पदवी घेईल. जमली तर दोनचार वर्षे नोकरी करेल मग लग्न करून देऊ अशा विचाराने पोरीची आई सुखावली होती. मायलेकींचं एकमेकीवर अगदी जीवापाड प्रेम. मुलीनेही वडिलांच्या जाण्यानंतर आईची धडपड पाहिली होती. आईच्या कष्टाची तिला जाणही होती. म्हाताऱ्या आजीआजोबांसाठी तर ती दुधावरची साय. रोज रात्री आईसोबत खुशालीचा फोन शिरस्ताच झाला होता. सगळं कसं अगदी आखीव रेखीव सुरू होतं. मार्च मध्ये करोनामुळे कॉलेज बंद झालं. मग प्रवासावर बंधने आली. इथे तर मुलगी महाराष्ट्रात आणि आई कर्नाटकात असल्याने भेटण्याचा मार्गही बंद झाला. पण तिथे आई आणि इकडे मुलगी सुखरूप, सुरक्षित होते. काळजीच...